उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर टीका केल्याने CM शिंदे खवळून म्हणाले, 'या घरबशांना...'

CM Eknath Shinde Slams Ex Chief Minister Uddhav Thackeray: "महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 30, 2024, 07:13 AM IST
उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर टीका केल्याने CM शिंदे खवळून म्हणाले, 'या घरबशांना...' title=
आपल्या एक्स अकाऊंटवरुन शिंदेंनी केली टीका

CM Eknath Shinde Slams Ex Chief Minister Uddhav Thackeray: "काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झालं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते," असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख न करता लगावला आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

यांच्याकडे दानत नाहीच

"वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही," असं एकनाथ शिंदेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच," असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. 

महिला वर्गाबद्दलची आस्थाही हिंदुत्वासारखीच बेगडी

"आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपयेही तुमच्या डोळ्याला टोचतात. बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही? त्यामुळेच आता मिळतात अगदी तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही, असे हे सांगतात. त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे," अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. "कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या, बॉडी बॅगमधूनही कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी?" असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला आहे.

मदतीला भीक म्हणून संबोधत...

"राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हस्ताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे, विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत," अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच पुढे बोलताना, "शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले, हे ध्यानात ठेवा," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी...

"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे जरा काही जणांनी आरशात बघावे," असा टोलाही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. "बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे," असं थेट आव्हानच शिंदेंनी ठाकरेंना दिलं आहे. 

तुम्ही शिवसेनेचेच हिंदुत्व बासनात बांधले

"महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत. या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का, असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला. तुम्ही तुमच्या शिवसेनेचेच हिंदुत्व बासनात बांधले... ते आधी लोकांसमोर कबूल करा," असंही एकनाथ शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.