बुलढाणा: जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने पीककर्जासाठी शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. ही घटना समजताच, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी पोलिस अधीक्षकांशी संपर्क करून तत्काळ आरोपींच्या अटकेसाठी कारवाई करण्यास सांगितले.
या प्रकरणी एका आरोपीला अटक झाली असून, बँक व्यवस्थापक फरार असल्याने त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आलंय. या बँक व्यवस्थापकाविरूद्धचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून तयार केला जात असून, त्याच्या निलंबनासाठी सुद्धा बँक व्यवस्थापनाकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. असे प्रकार जिल्हा प्रशासन अजीबात खपवून घेणार नाही आणि त्याच्याविरूद्ध कठोरातील कठोर कारवाई होईल, हे सुनिश्चित केले जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी स्पष्ट केले.
पीक कर्ज मंजूर करुन देण्यासाठी शेतक-याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यानं केली होती. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण यांच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शाखाधिकारी राजेश हिवसे याला अजूनही अटक झालेली नाही. या घटनेवर आता तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या घटनेच्या निषेधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सेंट्रल बँकेच्या शाखेला काळं फसण्यात आलं. तर ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रेदशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.