शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जुगार खेळणं ३१ जणांना चांगलंच महागात पडलं आहे. लातूर पोलिसांनी अशाच प्रकारच्या एका कारवाईत ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने ३१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहराजवळच्या कोळपा गावात कातळेंच्या शेतात जुगाराचा डाव रंगला होता. पोलिसांच्या ड्रोनची नजर या अड्ड्यावर पडली.
ड्रोन दिसल्यानंतर लगेच सगळे जुगारी जीव मुठीत धरून मिळेल त्या वाटेने पळत सुटले. जुगाऱ्यांना पकडण्यासाठी फक्त ड्रोनच नाही तर पोलीसही तगडा बंदोबस्त घेऊन या ठिकाणी आले होते. पळत असलेल्या जुगाऱ्यांच्या मागे धावून पोलिसांनी २३ जणांना ताब्यात घेतलं. तर ७ जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पोलिसांनी या आरोपींकडून पत्ते, मोबाईल, काही दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेले २३ आरोपी आणि पळून गेलेल्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सगळ्या ३१ आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा, भारतीय दंड विधानाच्या कलम १८८, २६९, २७०, कोव्हिड १९ उपाययोजना नियम, तसंच साथरोग प्रतिबंधक १८९७ च्या कलम २,३,४ प्रमाणे लातूरच्या विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.