पुणे : टॉयलेट... एक प्रेम कथा, अशा नावाचा चित्रपट लवकरच येऊ घातला आहे. या चित्रपटाची कथा काय असणार आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. पण, त्याआधी पुण्यात टॉयलेट हा बातमीचा विषय बनलाय आणि त्याचं कारण आहे, भ्रष्टाचार.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाशी निगडित, "टॉयलेट, एक प्रेम कथा" हा चित्रपट अभिनेता अक्षय कुमार घेऊन येत आहे... पुणे महापालिकेनं देखील नरेंद्र मोदींच्या स्वछ भारत अभियानातंर्गत शहरात वैयक्तिक टॉयलेट बांधण्याची योजना हाती घेतलीय. पण, ही योजना कशी राबवली जातेय ते पहा...
सुप्पर इंदिरा नगर परिसरातील रामनाथ परदेशींच्या घरात स्वच्छ भारत अभियानातंर्गत नुकतंच टॉयलेट बांधण्यात आलं आहे. असा महापालिकेचा दावा आहे आणि महापालिकेनं त्यापोटी ठेकेदाराला अठरा हजार रुपये देखील दिले आहेत. पण, घरातील व्यक्ती स्वतः सांगतेय की टॉयलेट दहा वर्षांपूर्वी बांधलंय... पण, याच टॉयलेटवर अठरा हजार रुपये लाटण्यात आलेत..
इंदिरा नगरमध्ये असंच एक दुसरं उदाहरण पाहायला मिळालयं. टॉयलेट पूर्ण झाल्यावर लाभार्थी म्हणजे घर मालकाचा फोटो लागतो... त्या जागेवर चक्क लहान मुलाचा फोटो वापरण्यात आला आहे.
ही फक्त दोन उदाहरणं झाली. पण, सुपर इंदिरा नगर परिसरात अशा पद्धतीने सुमारे, तीनशे बोगस टॉयलेट द्वारे निधी लाटण्यात आला आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मिलिंद राजहंस यांनी केलाय. तोही पुराव्यानिशी... या फसवणुकीत अनेक शकला लढवण्यात आल्या आहेत. एकाच घरातील तीन - तीन व्यक्तींच्या नावे टॉयलेट बांधल्याचे दाखवण्यात आले आहे.
या टॉयलेट घोटाळ्याची तक्रार राजहंस यांनी महापालिकेकडे केली आहे. त्यासाठी सर्व पुरावे देखील दिले आहेत. पण, महापालिकेकडून कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. माध्यमांनी या घोटाळ्याची विचारणा केल्यावरही, महापालिकेचे अधिकारी असं काही झालं नसल्याचं सांगतायत. आणि यापुढं देखील त्यांच्याकडून कारवाई होईल अशी शक्यता कमीच दिसतेय.
सुपर इंदिरा नगर इथला टॉयलेट घोटाळा हे फक्त एक उदाहरण आहे. शहरात इतरही भागात अशाच पद्धतीनं टॉयलेट बांधल्याचे भासवून निधी लाटण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे आता या योजनेत खरंच किती टॉयलेट बांधण्यात आले आहेत याची चौकशी होणं गरजेच आहे. कारण, ४५ हजार टॉयलेट बांधल्याचा महापालिकेचा दावा आहे. त्यामुळं घोटाळ्याची ही रक्कम कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.