बदलापूर बंदचं आवाहन होताना गृहविभागाचं लक्ष नव्हतं का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'काही गोष्टी...'

Devendra Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 20, 2024, 03:24 PM IST
बदलापूर बंदचं आवाहन होताना गृहविभागाचं लक्ष नव्हतं का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'काही गोष्टी...' title=

Devendra Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: बदलापुरात जी घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. शाळेतील दोन लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने ज्याप्रकारे अत्याचार केला ते निंदनीय आणि मन हेलावून टाकणारं आहे. जनतेमध्ये याचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग या आयजी लेव्हलच्या अधिकारी असून त्यांची नियुक्ती केली आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत चौकशी व्हावी अशी भावना आहे. पोलीस आयुक्तायलाच्या अंतर्गत कारवाई केली जात आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. 

बदलापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. आरोपीला फाशी देण्याची मागणी लोक करत असून, मागे हटण्यास अजिबात तयार नाहीत. पोलीस मात्र त्यांना कायदा-सुव्यवस्था हाती न घेण्याचं आवाहन करत आहेत. मात्र आंदोलक कोणत्याही परिस्थितीत रेल रोको मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.

देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना सांगितलं की, "यासंदर्भात चार्जशीट दाखल केली जाईल असे निर्देश दिले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे. अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकार आणि पोलीस विभागाचा असेल. जी कारवाई कऱणं आवश्य आहे त्याची सुरुवात वेगाने कऱण्यात आली आहे". 

"हा जमाव स्वयंस्फुर्तपणे आला की नाही यावर कमेंट करणं योग्य नाही. उद्रेक भावनांचा असू शकतो. पण जी मागणी होत आहे तात्काळ फाशी देण्याची, कायद्यानुसार तातडीने जे करता येईल ते राज्य सरकार करत आहेत ज्या संवेदनशीलतेने हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलिसांचा आहे", असं ते म्हणाले. 

"गृह विभागाचं याकडे लक्ष होतं. हे कोण करत होतं यावर आता भाष्य करणं योग्य नाही. आता कायदा सुव्यवस्था राखायची आहे. मुलीच्या कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत त्याचे खुलासे नंतर करु," असं सूचक विधान त्यांनी यावेळी केलं. 

पुढे त्यांनी सांगितलं की, "घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. तथापि त्याच्यात जाणीवपूर्वक दिरंगाई झाली का याची चौकशी एसआयटी करेल. जर कोणत्याही पद्धतीने दिरंगाई झाली असेल, एफआयर दाखल कऱण्यात उशीर केला असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल". 
 
सुप्रिया सुळे यांनी राजीनाम्याची मागणीकेल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "विरोधी पक्ष अशा गंभीर घटनात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात याचं दुर्देव वाटतं. संवेदना बोथट झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं वाटतं. अशा घटना घडतात तेव्हा राजकारण करायचं नसतं. पण यांच्या मनात केवळ राजकारण असून ते बाहेर येत आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण करणं शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात तेव्हा मोठ्या नेत्यांनी राजकीय वागू नये. जनतेला काय दिलासा देता येईल. न्याय कसा देता येईल असं वागायचं असतं. पण सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचं आहे".