पुणे : एस टी कर्मचारी संपात फूट पडल्याचे दिसत आहे. भोर एसटी डेपोतून ८ गाड्या मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
शिवसेनाप्रणित कामगार संघटनेचे कर्मचारी संपातून बाहेर पडले आहेत. पोलीस बंदोबस्तात एसटी बसेस रवाना करण्यात आल्यात.दरम्यान, या संपाला शिवसेनेने पाठिंबा दिलेला नाही. तर दुसरीकडे राज्यात एसटीचा संप सुरुच आहे. त्यामुळे राज्यात प्रवाशांचे ऐन दिवाळी सणात हाल झाले आहेत.
काल चर्चेच्या १३ फेऱ्या झाल्यात मात्र, एसटी कर्मचारी आणि सरकारमधील चर्चा पुढे सरकत नसल्याने संप सुरुच आहे. अजूनही कुठलीही बैठक मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि प्रशासन - कर्मचारी संघटना यांमध्ये बोलवण्यात आलेली नाही, त्यामुळे चर्चा ठप्प झालेय.
दरम्यान, एस टी संपात सहभागी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभाग नियंत्रक यांना एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्याच सोबत मुंडण, पुतळा जाळणे या आक्षेपार्ह गोष्टी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या ही सूचना देण्यात आल्यात. त्यामुळे संपाबाबत आता सरकार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ४ हजार ते ७ हजार रुपये पगार वाढ देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. हा प्रस्ताव एसटी कामगार संघटनेपुढे ठेवण्यात आला. मात्र, सातव्या वेतन आयोगावर एसटी कर्मचारी ठाम असल्याने संपाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. तर जेवढी जास्तीत जास्त वेतनवाढ करणे शक्य आहे. ती ऑफर एसटी कामगार संघटनेला देण्यात आली. मात्र, संघटना प्रतिनिधींचे समाधान झालेले नाही. त्यामुळे हा संप जर मागे घेतला नाही तर उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते, असा गंभीर इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलाय.