नागपूर : दिवाळी आली की प्रत्येकालाच नवीन कपडे आणि फराळाची ओढ लागली असते. सर्वजण आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा करतात. मात्र ज्यांना कुटुंब नाही अशी लहान मुले या आनंदोत्सवाला पोरकी होतात. कर्तव्य जाणीवेतून नागपूरच्या कर्त्यवम बहुद्देशीय संस्थेच्यावतीने अशाच पोरक्या असलेल्या ३ अनाथ आश्रमशाळेच्या ९० विद्यार्थांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
गेल्या ५ वर्षापासून या संस्थेच्यावतीने अनाथ विद्यार्थांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात येतो. यावेळी ९० विद्यार्थांना संस्थेतर्फे दिवाळीची भेट देण्यात आली. यात फराळ, सुगंधित उटणे,तेल,अत्तर बॉक्स, ड्राइंग शीट व गणपती उत्सवात गोळा करण्यात आलेल्या स्टेशनरीचा यात समावेश होता. खास अरुणाचल प्रदेशमधून आलेल्या मुलींनी यावेळी तेथील पारंपारिक नृत्य सादर केले. आमच्यासाठी हा वेगळा आनंददायी अनुभव असल्याचे उपस्थित विद्यार्थांनी यावेळी सांगितले.