शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर एकनाथ खडसे म्हणतात...

२०१४ साली भाजपला राज्यात अनुकूल वातावरण होते.

Updated: Feb 19, 2019, 03:37 PM IST
शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर एकनाथ खडसे म्हणतात... title=

जळगाव: शिवसेना आणि भाजप यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेसोबतची युती तोडण्यात एकनाथ खडसे सर्वात आघाडीवर होते. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीच्या घोषणेनंतर खडसे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. युती झाल्यामुळे भविष्यात फक्त भाजपचा नव्हे तर युतीचा मुख्यमंत्री असेल, असे वक्तव्य खडसे यांनी सांगितले. २०१४ साली भाजपला राज्यात अनुकूल वातावरण होते. त्यामुळे भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, यावेळची परिस्थिती पाहता युती झाली ते बरेच झाले. गेल्यावेळी भाजप-सेनेची युती नसल्याने भाजपचा मुख्यमंत्री झाला. मात्र, आता युतीचा मुख्यमंत्री होईल, अशी सावध प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

अविचारींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी एकत्र येतोय- उद्धव ठाकरे

वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलमधील संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला शिवसेना आणि भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, एकनाथ खडसे यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजपने शिवसेनेची मर्जी राखण्यासाठी जाणुनबूजून खडसे यांना कार्यक्रमापासून दूर ठेवल्याची चर्चा होती. याशिवाय, कार्यक्रमाला उपस्थित असणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनाही उद्धव ठाकरे यांच्या आगमनानंतर पहिल्या रांगेतून काढता पाय घ्यावा लागला होता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी शेलक्या भाषेत शिवसेना व उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यामुळेच सोमय्या यांना उद्धव ठाकरे यांच्यासमोरील रांगेतून उठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार की उपमुख्यमंत्रीपद?