Rahul gandhi's Bharat Jodo Nyay Yatra : आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याचा गांधी-नेहरु परिवाराशी जिव्हाळ्याचा संबंध राहिलाय. इंदिरा गांधी निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा नंदुरबारमधल्याच सभेतून करायच्या, नंतर राजीव गांधीही निवडणुकीच्या प्रचाराचा रणशिंग नंदुरबारमधून फुंकलं. सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सप्टेंबर 2010 मध्ये आधार कार्ड लॉन्च करण्यासाठी नंदुरबारच्या टेंभली गावाचीच निवड केली होती. 1952 पासून ते 2009 पर्यंत नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसच्या ताब्यात राहिलीय. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. नंदुरबारमधून आता भाजपा विजयाची हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहे.
2010 मध्ये सोनिया गांधींनी नंदुरबारचा अखेरचा दौरा केला होता. त्यानंतर गेल्या 14 वर्षात गांधी परिवाराचा सदस्य नंदुरबारच्या दौ-यावर दाखल झालाय. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साह शिगेला पोहोचलाय. नंदुरबारमध्ये दाखल होताच राहुल गांधींनी आदिवासी बांधवांसाठी मोठी घोषणाही करुन टाकली. ज्या भागात आदिवासींची ५० टक्के लोकसंख्या आहे तेथील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आदिवासींना दिला जाईल, 6 व्या शेड्युलमध्ये त्याचा समावेश केले जाईल, असं राहुल गांधी म्हणाले. आदिवासी बांधवाना गांधी कुटुंबियांविषयी नेहमीच आकर्षण राहिलंय. भारत जोडो यात्रेतून मोदी सरकारवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न राहुल गांधींचा आहे.
राहुल गांधींच्या यात्रेच्या समारोपवेळी इंडिया आघाडीची मोठी सभा शिवाजी पार्कवर होणार आहे. सोनिया गांधींनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीआधी शिवाजी पार्कवर सभा घेतली होती. त्यानंतर आता राहुल गांधी शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. ज्या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवारांसह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते हजर राहतील. राहुल गांधींच्या यात्रेनिमित्त मविआकडून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे.
दरम्यान, राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेमुळे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.. कार्यकर्त्यांना हुरुप येऊन त्यांचा उत्साह वाढण्यास मदत होईल अशी आशा आहे.. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे यानिमित्ताने महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्षही एकत्र येणार आहेत.