सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांनी केलेल्या संपानंतर अर्थराज्य मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय.
कर्जमुक्तीबाबत सरकार गंभीर असल्याचं सांगत कर्जमुक्तीबाबत अर्थसंकल्पातही चर्चा झाली होती असं त्यांनी सांगितलं. तर शेतक-यांनी शेतीमालाचं नुकसान करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, शेतीमालाला हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी १ जूनपासून बेमुदत संपावर गेलाय. राज्य सरकारबरोबरची बोलणी फिस्कटल्याने संपाचे हत्यार उपसले. आज संपाचा दुसरा दिवस आहे. सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संपाचा लढा तिव्र करण्याचा इशारा दिलाय. ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक दिलेय.
शेतकरी संपाला दोन दिवस होत असतानाही राज्यसरकारने कर्जमाफी बाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी येत्या ५ जून रोजी मुंबई वगळता महाराष्ट बंदची हाक दिली आहे. तर ६ जून रोजी सर्व सरकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.