सातारा : २०२० साली गुणरत्न सदावर्ते यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकील अंजुम पठाण यांनी पोलिसांची बाजू मांडली. यावेळी पोलिसांनी वृत्त वाहिनीच्या चर्चा सत्रात केलेले वक्तव्य हे कोणाच्या सांगण्यावरून केले आहे. त्याची चौकशी करणे आणि आवाजाची तपासणी यासाठी पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली.
सकाळी 11.24 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी वंश भेद,जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणविण्याचा प्रयत्न गुणरत्ने सदावर्ते यांच्याकडून होत आहे असे पोलिसांनी सांगितले.
गुणरत्ने सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी युक्तिवाद करताना पोलिसांनी दिलेल्या नोटीसाला दिनांक नाही. त्यामुळे सातारा पोलिसांनी केलेली अटक ही कायदेशीर प्रक्रियेत नाही. सरकारकडून हे प्रकरण रंगवून पुढे आणले जात आहेत. यात राजकीय हस्तक्षेप आहे, असा आरोप केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर दीड वर्षाने कारवाई का केली? पुरावे हस्तगत करण्यात आलेले आहेत असं तपास अधिकारीच सांगतायत. त्यामुळे रिकव्हरी गरज नाही असे ते म्हणाले. यावेळी वकील महेश वासवानी यांनी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांचा एकेरी उल्लेख केला. त्याला सरकारी वकील अंजुम पठाण यांनी जोरदार विरोध केला.
सरकारी वकील अंजुम पठाण यांनी कोरोना काळामुळे दीड वर्ष अटक करता आली नाही. तसेच तपास करता आला नाही त्यामुळे सदावर्ते यांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली.