प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक आणि पर्ससीन मच्छिमार यांच्यातला संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.
गेल्या वर्षी या वादाची पहिली ठिणगी पडली आणि पर्ससीन मासेमारीला पारंपरिक मच्छिमारांनी विरोध दर्शवला. सागरी संवर्धनासाठी सरकारने मग काही क्षेत्र राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आणि १२ नॉटिकल माईलच्या बाहेर पर्ससीन मासेमारी करण्यात यावी, असा आदेश काढला गेला. त्या आदेशात पर्ससीन मासेमारी करताना सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत पर्ससीन मासेमारी करण्यात यावी. त्यानंतर ती १२ नॉटिकलबाहेर करावी, असे नियमही टाकण्यात आले. मात्र, अशा सगळ्याच नियमांना हरताळ फासण्याचं काम पर्ससीन मच्छिमार करत असल्याचा आरोप होतोय.
पर्ससीन मासेमारीला विरोध करण्यासाठी आता पारंपरिक मच्छिमार संघटित होतायत. त्यासाठी दापोलीच्या हर्णे बंदरात कोकण किनारपट्टी भागातील पारंपरिक मच्छिमार सध्या एकत्र आलेत.
मुरूड ते बुरोंडीपर्यतच्या १० मीटरपर्यत क्षेत्र, बुरोंडी ते जयडच्या दरम्यान २० मीटरचं क्षेत्र, जयगड ते बांदा या किनारपट्टी भागाच्या २५ मीटर क्षेत्र पारंपरिक मच्छिमारांसाठी राखीव ठेवण्यात आलंय. या पुढील क्षेत्रात पर्ससीन मासेमारीसाठी क्षेत्र खुलं ठेवण्यात आलंय. मात्र राखीव क्षेत्रावर एलईडी मासेमारी होत असल्याचा आरोप होतोय. याला मत्स्यविभागाचा आशीर्वाद असल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे पदाधिकारी किरण कोळी यांनी केलाय.
या वादाच्या पार्श्वभूमीवर व्ही. एस सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमाण्यात आली. या समितीने पारंपरिक मच्छिमाराचं हित जपण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र सूचना असूनही पारंपरिक मच्छिमारांचं पर्ससीनमुळे प्रचंड नुकसान होतंय आणि समुद्र संपत्ती धोक्यात येत असल्याचा आरोप अखिल भारती मच्छिमार खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी केलाय.
एलईडी मच्छीमारीविरोधात आता जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. तसच मच्छिमारांची पुढील पिढी वाचवण्यासाठी सर्व प्रकारची विनाशकारी मासेमारी बंद करायला हवी, असं आवाहन हर्णै मच्छीमार संघर्ष समितीच्या सभेत नेत्यांनी केलंय. वेळ पडल्यास पर्ससीन मासेमारीच्या नौका फोडू आणि कायदा हातात घेण्याचा इशारा पारंपरिक मच्छिमारांनी केलाय. त्यामुळे आगामी काळात कोकण किनारपट्टी चांगलीच पेटण्याची चिन्हं आहेत.