शिवसेनेला आता अकोल्यातूनही झटका? माजी विधान परिषद आमदार शिंदे गटात जाणार

शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले माजी आमदारही शिंदे गटात?

Updated: Jul 19, 2022, 05:40 PM IST
शिवसेनेला आता अकोल्यातूनही झटका? माजी विधान परिषद आमदार शिंदे गटात जाणार title=

जयेश जगड, झी मीडिया अकोला : शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के मिळत असताना आता अकोल्यातूनही शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अकोल्याचे माजी विधान परिषद आमदार आणि शिवसेनेचे निष्ठावंत गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) हे एकनाथ शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहे.

त्यांच्या सोबत अकोला युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप सुद्धा शिवसेनेला राम-राम ठोकणार आहेत. यामुळे अकोल्यात शिवसेनेत मोठी खिंडार पडण्याची शक्यता आहे. 

बाजोरिया यांचे चिरंजीव विप्लव बाजोरिया हे सध्या हिंगोली-परभणीचे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत गोपिकीशन बाजोरिया यांचा पराभव झाला होता. त्यांच्या या परावभावला शिवसेनेचे बाळापूर आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख हे कारणीभूत असल्याची तक्रार बाजोरिया यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली होती.

मात्र पक्षप्रमुखाद्वारे संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने बाजोरिया नाराज आहेत. त्याचबरोबर आमदार नितीन देशमुख हे मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याने बाजोरिया यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. बाजोरिया यांना मानणारा एक वर्ग, शिवसैनिक , पदाधिकारी , नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहेत. 

या अनुषंगाने बाजोरिया यांच्या कार्यालयात आज सेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थितांना शिंदे गटात सामील होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. मात्र आपण शिंदे गटात अधिकृत प्रवेश घेतला नसल्याच बाजोरिया यांनी ऑफ दी रेकॉर्ड स्पष्ट केलं आहेय. उद्या इच्छुकांना घेऊन मुंबईला जाणार असल्याच त्यांनी म्हंटलंय. मात्र बाजोरिया यांचे चिरंजीव शिवसेनेत राहणार की तेही शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.