'स्पेशल छब्बीस' स्टाईलनं बेरोजगार तरुणांची फसवणूक

आदिवासी आयुक्तालयाचे बनावट सही शिक्के आणि कागदपत्रं बनवून बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

Updated: Dec 1, 2017, 05:57 PM IST
'स्पेशल छब्बीस' स्टाईलनं बेरोजगार तरुणांची फसवणूक title=

नाशिक : आदिवासी आयुक्तालयाचे बनावट सही शिक्के आणि कागदपत्रं बनवून बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

आदिवासी आयुक्तालयातल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या टोळीनं हुबेहूब शिक्के, कागदपत्रं बनवली होती. अप्पर आयुक्तांच्या नावानं कागदपत्रे बनवून बेरोजगारांना नियुक्ती पत्र दिली गेली.

एवढंच नाही तर, जिल्हा रुग्णालयात जाऊन उमेदवारांची मेडिकल टेस्टही करण्यात आली. यासाठी टोळीतल्याच एकानं अप्पर आयुक्त होऊन उमेदवारांची मुलाखत घेतली.

त्यानंतर कार्यालयात जाऊन रजिस्टरमध्ये रुजू झाल्याची नोंद करून घेण्यात आली होती. 'स्पेशल छब्बीस' चित्रपटाला साजेशी कार्यपद्धती वापरुन या टोळीनं ५० हून अधिक तरुणांची फसवणूक केली आहे.

यात शिपाई, क्लार्क, कार्यालयीन कर्मचारी अशा विविध पदांसाठी समांतर भारती प्रक्रिया राबवली गेली. या टोळीत निवृत्त मुख्याध्यापक, नांदगाव नगरपालिका शाळेतील शिक्षक, आदिवासी विकास विभागातील कर्मचारी, खासगी सुरक्षारक्षक, सहभागी आहेत.

यातल्या चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, आदिवसी विभागातल्या फरार कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे.