प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी: गटारीनिमित्त एकीकडे कोंबडी चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. आता कोंबडीसोबत चक्क खेळडेही चोरीला जात असल्याची घटना समोर आली आहे. ऐकून तुम्हालाही नवल वाटलं ना! मौल्यवान वस्तूंची ही चोरी नाही, तर ही चोरी आहे खेकड्यांची. आश्चर्य चकीत झालात ना, पण हे खरं आहे.
चेन्नईच्या केंद्रीय निमखारे मत्स्य संवर्धन संस्थेअंतर्गत असलेल्या परटवणे येथील युनिटमध्ये ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने पूर्ण तयार झालेले खेकडेच चोरून नेले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अज्ञात चोरट्याने पूर्ण तयार झालेले 12 हजार किमतीचे 300 ते 500 ग्रॅम वजनाचे 15 किलोचे खेकडे चोरले आहेत. या अनोख्या चोरीची रत्नागिरी शहराज जोरदार चर्चा सुरू आहे. या तलावातून २५ ते २६ जुलै दरम्यान अज्ञात इसमाने या खेकड्यांची चोरी केल्याचा संशय आहे.
केंद्राच्या व्यवस्थापक श्वेता पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात खेकडे चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. बॉक्समध्ये ठेवण्यात येणाऱ्या खेकड्यांना रोज खाद्य घालण्यात येतं. तेव्हा हा प्रकार लक्षात आला. दरम्यान ही चोरी खेकड्यांबद्दलची माहिती असणाऱ्यानेच चोरी केल्याचा संशय श्वेता पाटील यांना आहे. तब्बल १२ हजार रुपये किंमती खेकडे चोरीला गेल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.
येत्या रविवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे आकाडी साजरी करण्यासाठी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस असल्याने माहित गार खवय्यांनी ही चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.