रत्नागिरी : -एक दिवसाच्या विश्रांतीनंतर कोकणात जोरदार पावसाला सुरुवात झालीय. कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच कोकणात धुवाँधार पाऊस झालायं. लांजा, राजापूर, संगमेश्वर जोरदार सरी बरसल्या. सलग येणाऱ्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्ग, देवगड, मालवणमध्येही जोरदार पाऊस सुरू झालाय.
मुंबईत पावसाने जोरदार कमबॅक केलंय. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. मुंबईत परळ, दादर, माहीम, वांद्रे, अंधेरी, मालाड, कांदिवली आणि बोरीवलीत जोरदार पाऊस सुरु आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाने हजेरी लावलीय. तिकडे पालघर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीय. पहाटे पासून जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर शहरासह ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय.
या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीय. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन परिसरात पाऊस सुरु आहे. येत्या २४ तासांत कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.