अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरात दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती धीरज राणे,पत्नी सुषमा राणे 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी वण्या अशी मयतांची नावे आहे. पत्नीने गळफास घेतला आहे.
पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली तर पती आणि दोन मुलांचा मृतदेह पलंगावर होता. राणे कुटुंब त्यांच्या आईसह कोराडी नजीक ओम नगर येथे राहते.धीरज राणे आणि त्यांची पत्नी आज सकाळी उशिरा पर्यंत उठले नाही म्हणून त्यांच्या आत्या, आईने आवाज दिले. त्यावेळी धीरज यांची पत्नी सुषमा त्यांच्याशी बोलल्या असल्याची माहिती समोर येतेय. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सुषमा यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळली आहे. सुषमा राणे डॉक्टर होत्या तर धीरज नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर होते.
दुपारी १ ते दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस झाला आहे. दुपारी ११ नंतर या कुटुंबातील पत्नीने आत्या आणि सासू यांच्याशी बोलणं देखील केलं होतं. पोलीस उपायुक्त, निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील महिलेने वेगळ्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर कुटुंबातील इतर तिघाजणांचे मृतदेह हे वेगळ्या खोलीत बेडवर आढळले. यासोबतच सुसाईड नोट देखील मिळाली आहे. मात्र पोस्टमार्टम झाल्याशिवाय याबाबत कोणतीही माहिती दिली जाणार नाही, असं देखील ते म्हणाले. या प्रकरणाचा पुढील तपास कोराडी पोलीस करत आहे.