Imtiaz Jaleel Over Jalna Mumbai Vande Bharat Express: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानकावर जाऊन गोंधळ घातला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हे कार्यकर्ते रेल्वे स्थानकात ठिय्या मांडून बसले. एआयएमआयएम नेते तसेच छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचा उल्लेख उद्यापासून सुरु होत असलेल्या जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेमध्ये नसल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी हा गोंधळ घातला आहे. कार्यकर्त्यांनी याच मुद्द्यावरुन थेट रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारात रेल्वे स्थानकामध्ये घोषणाबाजी केली आणि अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. जलील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत का नाही असा सवाल या कार्यकर्त्यांनी विचारला. या गोंधळापूर्वीच स्वत: खासदार जलील यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या रेल्वेच्या कार्यक्रमावर सडकून टीका केली आहे. स्थानिक खासदार म्हणून आपण अनेकदा शहराची कनेक्टीव्हिटी वाढावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला मात्र त्यानंतरही 30 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आपला साधा उल्लेखही नाही, अशी खंत जलील यांनी व्यक्त केली आहे. जलील यांनी थेट दक्षिण रेल्वेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शेअर करत विकासाच्या राजकारणामध्ये घाणेरडं राजकारण का खेळलं जात आहे असा प्रश्न विचारला आहे.
जालना रेल्वे स्थानकावरुन 30 डिसेंबरपासून जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस सेवेला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदी या ट्रेनला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, परभणीचे आमदार संजय जाधव यांच्याबरोबरच इतर मान्यवरांच्या नावांचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेमध्ये आहे. मात्र दक्षिण रेल्वेच्या या निमंत्रण पत्रिकेमध्ये छत्रपती संभाजी नगरचे स्थानिक खासदार इम्तियाज जलील यांचं नाव लिहिलेलं नाही.
आपल्या नावाचा उल्लेख नसल्याने इम्तियाज जलील यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. यापुढे आपणही घाणेरडं राजकारण करणार असं जलील यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शेअर करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. "औरंगाबादचा खासदार असूनही मी रेल्वे आणि हवाई कनेक्टीव्हिटीसंदर्भात लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले. आता प्रत्यक्षात त्याबद्दलचं काम होत आहे तर ते सहज माझं नाव निमंत्रकांच्या यादीत टाकायला विसरले. अर्थात मला याबद्दल फार काही वाटत नाही. मात्र विकासाच्या मुद्द्यावर असं घाणेरडं राजकारण का? ट्रेन जालनामधून सुरु होते मात्र त्यांनी परभणीच्या खासदाराचं नाव जोडलं आहे तर औरंगाबादच्या खासदराचं नाव का जोडलेलं नाही? तुम्ही असं घाणेरडं राजकारण करणार असाल तर मी सुद्धा उद्या घाणेरडं राजकारण करणार. तयार राहा," असं जलील म्हणाले आहेत.
जलील यांचा अशाप्रकारे सरकारी कामावरुन खटका उडण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही काही वेळा त्यांनी अशाप्रकारे डावललं जात असल्याची भावना व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेऊन एआयएमआयएमचे खासदार असलेल्या जलील यांनी आम्ही आमच्या पद्धतीने उद्या काय करतो ते पाहा, असं सूचक इशारा वजा विधान केलं आहे. जलील यांनी मराठवड्यातील कोणत्याही खासदारापेक्षा आपण लोकसभेमध्ये येथील वाहतुक व्यवस्थेसाठी अधिक प्रश्न उपस्थित केले असूनही आपल्याला साधं निंत्रणही मिळालेलं नाही हे फारच खेदजनक असल्याचं म्हटलं आहे.