कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : मूळचे पाकिस्तानी असलेल्या ४५ जणांना पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिकत्व बहाल केलंय. मूळ पाकिस्तानी असलेले हे ४५ जण आता भारतीय आणि पक्के पुणेकर झाले आहेत. पाकिस्ताननं झिडकारलं असलं तरी भारतानं त्यांना स्वीकारलं आहे. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतरचा आनंद काय असतो ते या तरूणांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणं दिसतो आहे. पुण्यात आश्रयाला असलेल्या ४५ मूळ पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळालं. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याकावर होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून अनेकांनी भारतात आश्रय घेतला. त्यातले ४५ जण पुण्यात राहतात. या पुण्यातल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळालं. आता ते गर्वानं भारतीय असल्याचं सांगू शकतात.
मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ४५ नागरिकांना भारतीयत्व बहाल केलं. आपल्याच देशातून परागंदा व्हावं लागलेल्या या नागरिकांना भारतात मायेची ऊब मिळालीय. आता तर ते भारतीय असल्याचं अभिमानं सांगू शकतात.