अमरावती : अमरावतीच्या कॉलेजचा व्हॅलेंटाईन डेला मोठा कारनामा. प्रेमविवाह न करण्याची तरुणींना शपथ दिली. कॉलेजच्या कारनाम्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, यावरुन राजकारणही तापले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथे विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रेम न करण्याची शपथ देण्यात आली. त्याचे महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी समर्थन केले आहे. शपथेच्या माध्यमातून विद्यार्थीनींनी जनजागृतीचीचा प्रयत्न करत होत्या आणि कोणी काय शपथ घ्यावी, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे असे धक्कादायक विधान यशोमती ठाकूर यांनी केले. विद्यार्थीनीना जर वाटत असेल की शपथ घेतल्याने संरक्षण होत असेल तर त्यांनी शपथ घेतली असावी, असेही महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
दरम्यान, भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रीया आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही केवळ मुलींनाच का शपथ, असा थेट सवाल केला आहे. अमरावतीतील शपथेची घटना हास्यास्पद आहे. मुलांना छेडछाड न करण्याचा, अत्याचार करणार नाहीत, अॅसिड फेकणार नाही, अशी शपथ का दिली जात नाही, असा सवालही चित्रा वाघ आणि पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात दुर्दैवी अशा घटना घडत आहेत. पाच महिलांना जिवंत जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. सरकार सतत विधान करत आहेत तरीही अशा नरधमांवर धाक असल्याचं दिसत नाही. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत हे भूषणावह नाही. सुट्ट पेट्रोल आणि ज्वलनशील पदार्थांवर तात्काळ बंदी घालावी, ते सहज उपलब्ध होत आहे, याबाबत चिंता व्यक्त केली. केवळ फास्ट ट्रॅक खटला भरून उपयोग नाही तर एका महिन्यात अशा केसेसचा निकाल लावावा. अभ्यासू, अनुभवी आणि कार्यक्षम, महिलांची टीम सरकारकडे असावी. निर्भया केंद्र २१ आहेत, मात्र तिथे पोलीस नाहीत, उर्वरित निर्भया केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
अमरावतीतील चांदूर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला आहे. शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची. वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार अशी शपथ घेण्यात आल्यानंतर तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत.