Jalna Crime News : अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षक शिक्षा देतात. मात्र, जालना येथील जिल्हा परिषद शाळेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठी विषयाची प्रश्नोत्तरे लिहून न आणणाऱ्या विद्यार्थाला मुख्याध्यापकाने भयानक शिक्षा दिली आहे. मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. या मुख्याध्यापकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहागड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे. इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला खेडकर नावाच्या मुख्याध्यापकाने बेदम मारहाण केली आहे. शिक्षकाने केलेल्या बेदम मारहाणीत विद्यार्थ्याच्या मांडीवर छडीचे व्रण उमटल्याचे दिसत आहेत. मारहाण झालेला विद्यार्थी हा 14 वर्षांचा आहे. तो सातवीच्या वर्गात शिकतो. मात्र त्याच वय जास्त असल्याचं सांगत शिक्षकांनी त्याला आठ दिवसांपासून इयत्ता 9 वीच्या वर्गात बसायला सांगितल.
दरम्यान नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक खेडकर यांनी मराठी विषयाची प्रश्नोत्तरे लिहुन आणायला सांगितली होती. ती प्रश्नोत्तरे लिहून न आणणारे विद्यार्थी उठून उभे राहिले त्यात हा विद्यार्थी देखील होता. या विद्यार्थ्याला पाहताच तू नववीच्या वर्गात कसा काय आला असा प्रश्न विचारत मुख्याधापक खेडकर यांनी त्याला मांडीवर बेदम मारहाण केली.
मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने घडलेला प्रकार घरी आई वडिलांना सांगितला. त्यांनतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान या तक्रारीवरून गोंदी पोलिसांनी मुख्याध्यापक खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.