मुंबई : अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर गेल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या वादावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेशकारक आणि दुर्दैवी होते, पण पुरोगामी कार्यकर्त्यांचा आक्रोश जयंत पाटील यांच्या कानी पडताच, त्यांनी पक्षाची भूमिका, अत्यंत तत्परतेने स्पष्ट केली,' असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
'महात्मा गांधींची हत्या हे भारतातले पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचं समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे,' असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासीठावर वर विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेश कारक दुर्दैवी होते
पण पुरोगामी कार्यकर्त्यां चा आक्रोश @Jayant_R_Patil ह्यांच्या कानी पडताच त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत तत्परतेने स्पष्ट केली #आभार pic.twitter.com/XXQegGKJcz— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 24, 2020
शरद पोंक्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर का आले? याचं स्पष्टीकरणही जयंत पाटील यांनी दिलं आहे. 'राष्ट्रवादी वेलफेयर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात ३० लाखांहून अधिक रकमेची मदत केली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही आणि नसेल,' असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचार मानणारा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.