कल्याणकरांना दिलासा, नव्या दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे 31 मे रोजी लोकार्पण

नविन दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

Updated: May 29, 2021, 12:34 AM IST
कल्याणकरांना दिलासा, नव्या दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे 31 मे रोजी लोकार्पण title=

आतिष भोईर, कल्याण : कल्याणकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण मुंबई-ठाण्याला जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या नविन दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संध्याकाळी 5 वाजता या एका मार्गिकेचे ऑनलाईन लोकार्पण करणार आहेत. 

कल्याणसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील हजारो नागरिकांसाठी मुंबईला जाण्यासाठी हा महत्वाचा पूल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे त्याचे काम सुरुवातीला अत्यंत रडत खडत सुरू होते. आधी कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा, त्यानंतर लागोपाठ 2 वेळा दुर्गाडी खाडी परिसरात आलेला पूर आणि त्यानंतर लॉकडाऊन यामुळे पुलाचे काम होण्यास विलंब झाला.

एमएमआरडीए प्रशासनाने नविन कंत्राटदाराच्या माध्यमातून या पुलाच्या कामाला अधिक गतीने सुरुवात केली. त्यामुळे आता येत्या सोमवारी या महत्वपूर्ण पुलाची 2 पैकी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. आमदार भोईर यांनी आज या पुलाची एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे यांच्यासह या एका मार्गिकेची पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना ही माहिती दिली.

दरम्यान ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे. सर्वाधिक चर्चिला गेलेल्या पत्रीपुलानंतर आता शहरातील वाहतूक कोंडी फुटण्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नविन दुर्गाडी पूलही कल्याणकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.