Kolhapur Police Big Decision: काही महिन्यांपूर्वी राज्यभरामध्ये नको त्या कारणाने चर्चेत आलेल्या विशाळगडासंदर्भात कोल्हापूर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यामध्ये विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारामुळे या किल्ल्यावर संचारबंदी लागू करण्यात आली होती. सदर घटनेला पाच महिन्यांहून अधिक कालावधी उलटल्यानंतर आता प्रशासनाने संचारबंदी उठवली आहे. त्यामुळेच आता पर्यटक आणि भक्तांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत गडावर जाता येणार आहे. मात्र संचारबंदी उठवताना काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत.
विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती. मात्र आता तब्बल पाच महिन्यानंतर प्रशासनाने 31 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी तत्वत: उठवण्यात आली आहे. त्यामुळेच आता सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून पर्यटकासाठी विशाळगड दिवसातील सात तासांसाठी का असेना खुला झाला आहे. पण ही परवानगी देत असताना जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना अनेक अटी घातल्या आहेत.
प्रशासनाने संचारबंदी उठवताना नेमक्या कोणत्या अटी-शर्ती घातल्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात...
> किल्ले विशाळगडावर पर्यटक आणि भक्तांना सकाळी 10 ते 5 या वेळेतच जाता येणार आहे. 5 वाजल्यानंतर कोणालाही किल्ल्यावर प्रेवेश दिला जाणार नाही.
> विशालगडावर जात असताना कोणत्याही प्रकारचे मांस घेऊन जाता येणार नाही. किंवा त्या ठिकाणी मांस शिजवून खाता येणार नाही.
> गडावर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटक/भक्ताची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे.
> कोणत्याही संघटनेच्या व्यक्तींना गडावर आंदोलन किंवा निदर्शने करता येणार नाही.
> विशाळगड या ठिकाणी कोणताही धार्मिक किंवा इतर कार्यक्रम घ्यायचा असेल तर पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
जुलै महिन्यातील हिंसाचारानंतर या ठिकाणी पोलिसांचा खडा पाहरा ठेवण्यात आला आहे. गडाच्या तळाशीच पोलिसांचा मागील पाच महिन्यांपासून एक तळ असून या ठिकाणी कायम पहारा ठेवला जात आहे. आता याच ठिकाणी गडावर जाणाऱ्यांची तपासणी करुन त्यांना गडावर जाण्यास परवानगी दिली जाणार आहे. धार्मिक मतभेदांमुळे विशालगडावर हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर येथील वातावरण चांगलेच तापले होते. तेव्हापासूनच या भागामध्ये तणावपूर्ण शांतता असून कायम इथे पोलिसांचा पहारा दिसून येतो. आता येथे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये थोडा दिलासा देण्यात आला आहे.