मुंबई : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी राजकीय पक्ष करत आहे. यामध्ये निवडणूक आयोगही कुठे मागे राहिले नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. पेड न्यूज आणि समाजमाध्यमांचा गैरवापर करणारया उमेदवारांना निवडणूक आयोगाने चांगलाच चाप लावला आहे. मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार, रायगडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना निवडणूक आयोगाने नोटीसा बजावल्या आहेत.
पार्थ पवार यांच्या पनवेलमधील प्रचार दौऱ्याच्या बातम्या वेळापत्रकासह एकसारख्या तीन दैनिकांमध्ये छापून आल्या आहेत. त्यामुळे या बातम्या पेडन्यूजमध्ये का समाविष्ट करू नये याचा खुलासा नोटीसीव्दारे मागवण्यात आला आहे. या निवडणुकी पासून सोशल मीडियावरील प्रचारावरही नजर असणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे आपल्या सोशल मीडिया प्रचाराच्या खर्चाची माहीतीही आयोगाला असणे हे राजकीय पक्षांसाठी बंधनकारक आहे. याचे पालन न करणाऱ्यांनाही आयोगाने दणका दिला आहे.
सुनील तटकरे व अनंत गीते यांच्या फेसबुकवरील प्रचाराला आयोगाने आक्षेप घेतला आहे. फेसबुकवर ज्या जाहीराती प्रसारीत करण्यात आल्या आहेत त्या आयोगाकडून प्रमाणित करून घेतल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे . आयोगाच्या या नोटीशीनंतर या राजकीय पक्षांचे धाबे दणाणले असून त्यांनी माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समितीकडून फॉर्म नेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.