औरंगाबाद : महिनाभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. अशात औरंगाबाद काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. त्याचवेळी औरंगाबाद काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला जबर झटका दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद राष्ट्रवादीपेक्षा अधिक असल्याचे सांगत लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी काँग्रेसने सुरु केली आहे. जातीय समीरकरण डोळ्यासमोर ठेवून तुल्यबळ उमेदवार द्यायचा, अशी आखणी काँग्रेसने केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी औरंगाबादच्या जागेसाठी आग्रही असताना आता काँग्रेसनेही तयारी सुरू केल्यामुळे, आघाडीत मतभेद होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटपाची बोलणी अद्याप सुरु आहेत. आठ जागांवर तिढा होता. त्यापैकी तीन जागांचा तिढा सुटला आहे. मात्र, ५ जागांचा तिढा कायम आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली. आता ही चर्चा राज्यपातळीवर होणार आहे. त्यामुळे काही जागांचा प्रश्न सुटत नसल्याने दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची घोषणा व्हायची आहे. मात्र, औरंगाबाद जागेवरुन दोन्ही काँग्रेसमध्ये चढाओढ आहे. असे असताना काँग्रेसने येथे उमेदवारांची चाचपणी सुरु केली असून मुलाखतीही घेतल्या. त्यामुळे आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशपातळीवर महाआघाडी उभारण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यात भाजपविरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीचे प्रमुख घटकपक्ष आहेत. त्याचबरोबर इतर लहान पक्षही या महाआघाडीत सहभागी होत आहेत. मात्र अनेक बैठकानंतरही राज्यातील या महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मित्र पक्षांच्या जागा वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जागांचे वाटप अद्याप शिल्लक असे असताना काँग्रेसने मराठवाड्यात उमेदवार चाचपणीला सुरुवात कशी केली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.