Ramdas Kadam Slam Uddhav Thackery: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांवर टीका करताना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र याचाच संदर्भ देत रामदास कदमांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उद्धव ठाकरेंची औकात काय आहे? असा प्रतिप्रश्न केला. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदमांनी हे विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांनी ही टीका केली आहे.
भाजपाचं हिंदुत्व गोमुत्रवादी हिंदुत्व आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. भाजपाचे लोक अश्लील भाषेत शिव्या देतात असा दावा करतानाच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना पुतिन यांच्याशी केली आहे, असं म्हणत रामदास कदम यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रामदास कदमांनी, "उद्धव ठाकरेंना दुसरा धंदा नाही. कुठे मोदी आणि कुठे उद्धव ठाकरे. त्यांच्याकडे आहे तरी काय? शिव्या देण्याचं काम करणार ते. त्यांच्याकडे जे काही थोडेफार नेते होते ते सुद्धा एक एक करुन जात आहेत. हळूहळू सगळेच सोडून जातील आणि एखाद्या रात्री उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आणि पत्नी तिघेही बॅग भरुन देश सोडून निघून जातील. ते सुद्धा रात्री जातील दिवसा जाणार नाहीत," असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> 'उद्धव ठाकरेंना कानफाटीत...'; CM शिंदेंचा उल्लेख करत रामदास कदमांचं विधान
यानंतर एका महिला पत्रकाराने उद्धव ठाकरेंच्या भाषणाचाच संदर्भ देत मोदी हुकुमशाहाप्रमाणे वागतात असं म्हणत त्यांची तुलना पुतिन यांच्याशी करण्यात आल्याचा उल्लेख केला. या तुलनेसंदर्भात रामदास कदमांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली. "अरे, उद्धव ठाकरेंची औकात काय आहे मोदींसमोर? ज्यांनी बाळासाहेबांचं, उद्धव ठाकरेंच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलेल्या व्यक्तीचा आदर करायला हवा होता. मात्र उद्धव ठाकरे कृतघ्न आहेत. ते काँग्रेसचे पाय चाटू लागले आहेत. त्यामुळे ते आज बिघडले आहेत. त्यांची मोदींबद्दल बोलण्याची औकात नाही," असं रामदास कदम म्हणाले.
नक्की वाचा >> 'उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर यापूर्वीही अशाप्रकारे टीका केली आहे. उद्धव ठाकरे गट सोडताना रामदास कदमांनी प्रसारमाध्यमांसमोर भावनिक होत अनेक गंभीर आरोप करत शिंदे गटामध्ये सहभागी होत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतरही अनेकदा त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आहे.