अरुण मेहेत्रे, झी २४ तास, बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबीय सर्वात जास्त चर्चेत असतं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत दोन गट पडल्यानंतर कार्यकर्त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. काहींना तर दोन गट पडू शकतात, यावर विश्वास बसत नव्हता. त्यात कोणाला मतदान करायचं असा प्रश्न मतदारांना पडला होता. सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे यावर खासदार ठरणार असल्याने दोन गट आहेत हे मतदारांच्या मनात पक्क झालंय. दरम्यान
सुप्रिया सुळे बराच वेळ अजित पवारांच्या घरी होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या... मात्र या भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आलं... कारण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नणंद भावजयीच्या लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. त्यातच आई प्रतिभा पवार, लेक रेवती सुळे यांच्यासोबत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांचं घर गाठलं.... मात्र या भेटीमागचं कारण सुप्रिया सुळेंनीच सांगितलं...
सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आई आशाताईंबाबत भावनिक आठवणी सांगितल्या असल्या तरी यावरुनच आता भावनिक राजकारण सुरु झालंय. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी का जाऊ नये? अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली.
दीड महिने आशाकाकी बारामतीमध्ये होत्या. तेव्हा सुप्रिया सुळे त्यांना भेटायला का गेल्या नाहीत? अशी टीका अजित पवार गटाकडून करण्यात आलीय. अजित पवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे अचानक गेल्याने आता राजकारणही जोरात रंगतंय..
पवार कुटुंबातले राजकीय वाद वेगळे आणि कौंटुबिक संबंध वेगळे असणार हेच सुप्रिया सुळेंच्या भेटीतून स्पष्ट होतंय.. मात्र या भेटीनंतर बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.