Maharahstra Rain : महाराष्ट्रातील पाऊस दरवर्षी त्याची बहुविध रुपं दाखवतो. पण, यंदा मात्र ही रुप दाखवण्याइतकाही पाऊस राज्यात झालेला नाही. जून महिन्यात पावसानं समाधानकारक सुरुवात केली. पण, जुलैच्या अखेरीस मात्र त्यानं काढता पाय घेण्यास जी काही सुरुवात केली ते पाहून हवामान विभागही चिंतेत पडला. शेतकऱ्यांच्या शेतकामांचा वेग मंदावला आणि शहरी भागांमध्ये लागू असणारी पाणीटंचाई सुरुच ठेवण्यात आली. आतातरी या पावसानं परतावं अशीच इच्छा सर्वांनी व्यक्त केली. अखेर आता हा पाऊस सर्वांच्या मनातील ही इच्छा पूर्ण करणार आहे.
पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळेल. तर, काही भागांमध्ये मात्र हा पाऊस मनसोक्त बरसणार आहे. जुनच्या तुलनेत जुलै महिन्यात सरासरीहून जास्त पाऊस पडला. पण, ऑगस्टमध्ये मात्र त्यानं हिरमोड केला. आता सप्टेंबर महिन्यात मात्र पाऊस मोठा दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. किंबहुना सप्टेंरची सुरुवातच पावसानं होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चार दिवसांमध्ये राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होणार असून, 3 आणि 4 सप्टेंबरला तो अधिक जोर धरताना दिसेल. मराठवाडा, कोकण आणि विदर्भात या दिवसांदरम्यान समाधानकारक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागानं तूर्तास 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
पावसानं अचानकच काढता पाय घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती वाईट वळणावर असल्याचं पाहायला मिळत आहे. इथं असणाऱ्या नर्सरींनाही याचा मोठा फटका बसतोय.जिल्ह्यात पाऊस नसल्याने नर्सरी चालकांचं लाखोंचं नुकसान होत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने आंबा, सिताफळ, जांभूळ, लिंबू, पेरू अशी अनेक रोप सुकून गेली आहेत. प्रत्येक वर्षी वीस ते पंचवीस लाखांचं उत्पन्न असताना, यंदा मात्र रोपांचा खर्चही निघणंही अवघड झाल्यामुळं आता एक नवं आव्हान उभं राहताना दिसत आहे.