Sanjay Raut On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकत्र येण्याची गरज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याचसंदर्भात बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्र हिताचा उल्लेख करत राऊतांनी हे विधान केलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं यासंदर्भात चर्चा सुरु असल्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी मराठी माणसाचा मुद्दा अधोरेखित केला. "मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम कोणीही करु नये. मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग हा मराठी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला, मनसेला मानणारा वर्ग मराठी आहे. भविष्यात महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्हाला गंभीर्याने पावलं टाकावी लागतील. कालचा निकाल मी जनतेचा कौल मानत नाही. जो कौल म्हणून समोर आणला आहे त्यावर प्रत्येक राजकीय पक्षाला ज्यांना मराठी माणसाबद्दल आस्था आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे त्यांनी 106 हुतात्मांचा लक्षात ठेऊन बाळासाहेबांनी दिलेला पाठीचा कणा मोडण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्याविरोधात आम्हा सगळ्यांना एकत्रित बसून विचार करावा लागेल असं माझं मत आहे," असं राऊत म्हणाले.
2014 पासून ठाकरे ब्रॅण्डला उतरती कळा लागली आहे. ठाकरेंनी एकत्र येणं गरजेचं आहे असं वाटतं का? असं राऊतांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी, "मोदी-शाहांची पावलं ही पहिल्या पासून महाराष्ट्रात ठाकरे आणि शिवसेना राहूच नये, शरद पवार आणि राष्ट्रवादी राहू नये. दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड न करणारे आहेत. वैचारिक भूमिका असतात. हे पक्ष महाराष्ट्राचा कणा आहेत. अस्मितेसाठी लढणाऱ्या या दोन पक्षांना संपवायचं त्यासाठी केलेली कारस्थानं उघड झाली आहे. आम्ही अदानींच्या पैशाच्या राजकारणाला विरोध केला. त्यांचे पैसे वापरुन आमच्या पराभव केला. अमेरिकेत अरेस्ट वॉरंट निघाले. महाराष्ट्रात अदानींचा पक्ष जिंकला. ते दाखवत आहेत की महाराष्ट्रात अदानींना पाठींबा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी असेल. कुणी भाजपा, समाजवादी, अन्य पक्ष किंवा एमआयएममध्ये असतील त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. जे काही महाविजायचं बांडगुळ जन्माला आलं आहे त्याला भविष्यात खतं पाणी न घालणं हे प्रत्येक मराठी माणसाचं, नेत्याचं काम आहे," असं उत्तर दिलं.
राज ठाकरेंबद्दल स्पेसिफिकली तुमचं काय मत आहे? असं विचारलं असता राऊतांनी, "त्यांनी (राज ठाकरेंनी) अशी भूमिका घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. निवडणुका संपलेल्या आहेत. हा विचार आपण महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे," असं म्हटलं. पुढे बोलताना, "कोण जिंकलं यापेक्षा सत्ता येणं, मुख्यमंत्री होणं, दिल्लीत मोदींनी जयजयकार करणं मोदींचा विजय. महाराष्ट्रात कसला मोदींचा विजय? महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय व्हायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचा विजय व्हायला पाहिजे. शरद पवारांचा विजय व्हायला पाहिजे. मोदींचा विजय, अमित शाहांचा विजय महाराष्ट्रामध्ये? काय संबंध त्यांचा? महाराष्ट्र लुटून गुजरातला नेला. लाज वाटली पाहिजे उद्या शपथ घेणाऱ्यांना," अशा शब्दांमध्ये राऊतांनी संताप व्यक्त केला.