ज्ञानेश सावंत, झी मीडिया, मुंबई : Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्रात कोणाची सत्ता या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाला नुकताच जाहीर झाला आणि यामध्ये महायुतीचच पारडं जड असल्याचं दिसून आलं. सत्तेच्या चाव्या एकमतानं महायुतीकडेच असल्याचं स्पष्ट होत असलं तरीही मुख्यमंत्रीपदी कोणाच्या नावाला पसंती दिली जाणार इथपासून राज्यात सत्तास्थापना आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी नेमका केव्हा पार पडणार याविषयीच्याच प्रश्नांना सातत्यानं वाव मिळताना दिसला. त्यातच राष्ट्रपती राजवटीसंदर्भातील माहितीसुद्धा समोर आली.
26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार अस्तित्वात येणं किंवी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं बंधनकारक नाही अशी माहिती विधामंडळातील सूत्रांनी दिली आहे. विद्यमान विधानसभेची मुदत 26 तारखेला संपत असल्याने राज्यात मध्यरात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट लागेल ही धारणा चुकीची असल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं. या शक्यतेस गतकाळातील काही उदाहरणंही दिली.
यापूर्वी एनेकदा विधानसभेची मुदत संपल्यानंतरही मुख्यंत्र्यांचे शपथ विधी झाले आहेत. दहाव्या विधानसभेची मुदत 19 ऑक्टोबर 2004 रोजी संपली होती, ज्यानंतर 11 व्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 1 नोव्हेंबर 2004 रोजी झाला होता. तर, अकराव्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2009 रोजी संपली आणि बाराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 7 नोव्हेंबर 2009 रोजी झाला होता. पुढं बाराव्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबर 2014 रोजी संपली त्यानंतर तेराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 31 ऑक्टोबर 2014 रोजी झाला होता. तेराव्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपली तर चौदाव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबर 2014 रोजी झाला होता.
थोडक्यात राज्यात सरकार स्थापन होण्यास वेळ घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळं 26 तारखेपूर्वीच नवीन सरकार अस्तित्वात आले पाहिजे असे कोणतेही संवैधानिक बंधन नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं नवीन सरकार अस्तित्वात कधी येणार आणि शपथविधीचा मुहूर्त नेमका कधी साधला जाणार याबाबत राज्यभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.