सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : परतीच्या पावसानं (Rain) अख्खं पिक (Crop) वाया गेलं. शेतकऱ्यावर (Farmers) शेतात मजुरी करायची वेळ आली. ही व्यथा आहे बारामतीतल्या (Baramati) शेतकऱ्यांची. परतीच्या पावसानं बारामतीत कसा हाहाकार माजवलाय पाहुयात. (maharashtra baramati damage to crops due to return rains, time of labor for loan repayment to farmers)
परतीच्या पावसानं पिकांचा बट्ट्याबोळ झाल्यामुळे आता कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर दुसऱ्यांकडे मजुरी करण्याची वेळ आलीय. परतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका बसलाय तो अल्पभूधारक शेतकऱ्यांना. हे आहे बारामती तालुक्यातील कऱ्हा वाघ गाव. इथल्या गावडे कुटुंबानं दोन एकरात बाजरी लावली. पण परतीच्या पावसामुळे अख्खी बाजरी पाण्याखाली गेलीय.
फक्त बाजरीच नाही तर सूर्यफूलही वाया गेलं. कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न गावडे कुटुंबासमोर आहे. कारण सरकारी मदत सोडाच नुकसानीचे साधे पंचनामेही झालेले नाहीत. आता गावडे कुटुंबावर मजुरी करण्याची वेळ आलीय.
रमाकांत गावडे यांच्यासारखीच अवस्था झालीय संजय शिंदे यांची. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. पण परतीच्या पावसानं शेतात असलेलं मका आणि बाजरी मातीमोल झालीय. संजय शिंदे मूकबधीर आहेत. त्यांच्याही कुटुंबावर मजुरी करण्याची वेळ आलीय.
परतीच्या पावसानं बळीराजाचं कंबरडं मोडलंय. सारं पीक पाण्यात गेल्यामुळे आता कर्जाची परतफेड कशी करायची हा प्रश्न आहे. नुकसानीचे पंचनामेच झालेले नसल्यानं सरकारी मदतीपासूनही वंचित आहे. त्यामुळे मोडून पडलेल्या या बळीराजाला मदतीचा हात देण्याची गरज असून सरकारनं तातडीनं पावलं उचलायला हवीत.