Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळणं ही फार दुर्देवी आणि मनाला मनाला दु:ख देणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. नेव्हीने सहा महिन्यांपूर्वी चांगल्या भावनेने कार्यक्रम घेतला होता. पण दुर्दैवाने महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. त्यासाठी काल महत्वाची बैठक बोलावली होती अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांवर, चरणांवर 100 वेळा डोकं ठेवायला तयार आहे. 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही असंही ते म्हणाले आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, "त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलाचे अधिकारी होती. त्या बैठकीत दोन समित्या केल्या आहेत. एक समिती पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी आणि कारवाई, तसंच दुसरी समिती ज्यामध्ये तज्ज्ञ असतील ज्यांना महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव आहे. याशिवाय शिल्पकार, इंजिनिअर, नेव्हीचे अधिकारी असतील".
"शिवभक्तांच्या भावना तीव्र आहे, लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा राहिला पाहिजे अशी सर्वसामान्यांची भावना आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष देत आहोत असंही त्यांनी सांगितलं. तसंच त्या ठिकाणी आता भव्य, भक्कम पुतळा उभा राहील असंही त्यांनी सांगितलं. तेथील हवामान, वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन पुतळा उभारला जाईल," असंही ते म्हणाले.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 29, 2024
विरोधक माफी मागण्याची मागणी करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "झालेली घटना अतितश दुर्दैवी, दु:ख देणारी आहे. चांगल्या भावनेने तो पुतळा उभारण्यात आला होता. पण या घटनेचं राजकारण करणं त्यापेक्षा दुर्दैवी आहे. विरोधकांकडे राजकारण करायला अनेक विषय आहेत. महाराज आपलं दैवत, अस्मिता आहेत, त्यावर राजकारण करु नये. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत असून त्यांच्या पायांवर. चरणांवर एकदा नाही तर 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही. कारण त्यांचा आदर्श घेऊनच राज्याचा कारभार करत आहे. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना त्यांनी सुद्बुध्दी द्यावी अशी मागणी करतो".
कालच्या बैठकीत नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर सुरक्षित करण्याची मागणी केली आहे. त्यांना पाहणी करणं, पुतळा पुन्हा उभा करणं यासाठी मागणी केली आहे अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. अजित पवारांनी जाहीर माफी मागितली. शिवसेना, भाजपा, अजित पवार आम्ही सर्व महायुतीत काम करतोय. शिवाजी महाराज राजकीय विषय होऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही यात राजकारण करण्यापेक्षा महाराजांचा भव्य दिव्य पुतळा कसा उभा राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे असंही ते म्हणाले.