मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Maharashtra) राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात कोरोना (Coronavirus) बाधित रुग्ण जास्त वाढत असल्याने बेड मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवरही ताण येत आहे. प्रथमच रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची (health workers) तातडीने भरती (Urgent recruitment) करण्यात येणार आहे.
मुंबईसह अनेक जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पदभरतीबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.
सरकारतर्फे कोरोनाला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची 10 हजार 127 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत 10 हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावावर शासनाकडून प्रभावी हाताळणी आणि नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने ही सगळी पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्तमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरु होईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.