प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : आतापर्यंत तुम्ही माणसाला दारुचं व्यसन जडल्याचं ऐकलं असेल. पण तुम्ही कोबडयांला दारुचं व्यसन लागल्याचे ऐकले आहे का? नाही ना.. पण हे खरं आहे. भंडाऱ्यात चक्क एका कोबडयांला दारुचं व्यसन जडलंय. इतकंच काय दारू घेतल्या शिवाय कोंबडाच्यां घशात अन्न-पाणीही जात नाही.
भंडारा शहरानजीक असलेल्या पिपरी पुनर्वसन गावातील भाऊ कातोरे हे पेशाने शेतकरी आहेत. भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालनही करतात. त्यांमुळे त्यांच्याकडे विविध प्रजातिचे कोंबडे पहायला मिळतात. पण सध्या ते आपल्या एका कोबडयाच्या वाईट सवयीमुळे चिंतेत आहेत.
त्याचं झालं असं की या कोंबड्याला 'मरी' हा आजार झाला होता. कुणीतरी त्यावर मोहफुलांच्या दारूचा उपाय सांगितला. मोहाची दारू सहसा मिळत नसल्यानं आपल्या लाडक्या कोंबड्यासाठी भाऊंनी चक्क विदेशी मद्य आणलं. त्यानं रोग तर बरा झाला, पण आता हा कोंबडा पक्का बेवडा बनलाय. दर 4 दिवसांना दारूची एक क्वार्टर तो रिचवतो. महिन्याला 2 हजारांचा भुर्दंड पडतोय.
भाऊ कोंबड्याचं व्यसन सोडवण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी त्यांनी पशूवैद्यांनाही दाखवलंय. पण त्याचा उपयोग झाला नाही. पशूवैद्यक अधिकाऱ्यांनी मात्र यामुळे कोंबड्याला कोणताही अपाय होणार नसल्याचं सांगितलंय.
या कोंबड्याचा व्हिडिओ सध्या भरपूर व्हायरल होतोय. कोंबडा कातोरेंच्या घरात सगळ्यांचाच लाडका आहे. त्यामुळे तो व्यसनाधीन झाला असला तरी त्याचे हे लाडही पुरवले जातायत. मात्र त्याच्या या अजब सवयीमुळे पंचक्रोशीत तो चर्चेचा विषय झालाय, हे मात्र नक्की.