Maharashtra Job: सरकारी नोकरी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सरकारी नोकर भरतीबद्दल फार कमी जणांना माहिती मिळते, अर्ज करेपर्यंत शेवटची तारीख निघून जाते, अशी कारणे अनेकदा सांगितली जातात. तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभागातील भरतीसंदर्भात मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5 हजार 639 अंगणवाडी सेविका आणि 13 हजार 243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18 हजार 882 पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
महिला व बालविकास विभागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी लवकरच नोटिफिकेशन जाहीर करण्यात येईल. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील यात देण्यात येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतचर अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे.