देवेंद्र फडणवीसांना 'कलंक' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं; पाहा काय म्हणाले...

Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात केली होती. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्वव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 11, 2023, 08:15 AM IST
देवेंद्र फडणवीसांना 'कलंक' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं; पाहा काय म्हणाले... title=

Maharashtra Politics : शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. सोमवारी नागपुरात (Nagpur) बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेले कलंक आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  याला देवेंद्र फडणवीस कलंकीचा काविळ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेने भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही उद्धव ठाकरे यांना खडसावलं आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही - नितीन गडकरी

"श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही," असे नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो असे ते सांगत आहे. आधी उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? 2014 ते 2019 तुमच्याबरोबर सत्तेत होतो. 2014 साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

उद्धव ठाकरेंनी ऐकवली देवेंद्र फडणवीसांची ऑडिओ क्लिप

या सभेवेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस यांनीराष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही. आपत धर्म नाही, शाश्वत नाही. एकवेळ सत्तेशिवाय राहू. एकवेळी अविवाहीत राहणं पसंत करेल. पण, राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं असून उद्धव ठाकरे यांना कलंकीचा काविळ असं म्हटलंय. फडणवीस यानी आपल्या ट्विटमधअये म्हटलंय.
1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!
असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!