निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : मालेगावत ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का बसला आहे. रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज (Loan) घेण्याकरिता बनावट दस्तऐवज तयार करून जिल्हा बँकेची 7 कोटी 46 लाख रुपयांचे कर्ज घेऊन परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) भोपाळ येथून ताब्यात घेतलं. बुधवारी रात्री उशिरा मालेगावच्या रमजानपूरा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणल्यानंतर अटक करण्यात आली आहे. हिरे यांना नाशिक येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेले जात असतांना हिरे समर्थकांनी गोंधळ घालीत पोलीस वाहनाला गराडा घातला व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी कसेबसे कार्यकर्त्यांना बाजुला सारत पोलीस वाहन रवाना केले. यावेळी मंत्री दादा भुसे यांच्याविरुद्धही घोषणा देण्यात आल्या.
आज अद्वय हिरे यांना मालेगावच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिवसेना फुटीनंतर हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून हिरे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. काही दिवसांपूर्वी मंत्री भुसे यांनी अद्वय हिरेंचे नाव न घेता जिल्हा बँकेत तब्बल 32 कोटींचा हा घोटाळा झाल्याचा आरोप करत सहकार खाते निश्चितपणे यावर कारवाई करेल, असा इशारा दिला होता. याप्रकरणी हिरे यांचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळताच त्यांना नाशिक पोलिसांनी भोपाळ ताब्यात घेतले. रात्री न्यायालयात आणले जाणार असल्याचे समजताच हिरे यांच्या समर्थक कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती.
नाशिक येथील भाजप नेते अद्वय हिरे पाटील यांनी 27 जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना भवनात पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी शेकडो शिवसैनिकही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाताला शिवबंधन बांधून नंतर शाल पांघरून त्यांचे स्वागत केले. यावेळी, मी कधीही भाजपाकडे कोणतेही पद मागितले नाही, मात्र नेहमीच शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. भाजपाने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे मदत केली नाही तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला, असे अद्वय हिरे यांनी म्हटलं होतं.
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात अद्वय हिरे पाटील यांच्या कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री प्रशांत हिरे यांचे ते पुत्र आहेत. त्यामुळे मालेगावचे शिंदे गटाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा सामना करण्यासाठी उद्धव ठाकरेंना आता तगडा नेता मिळाला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.