Maharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूल

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाचं बदललेलं रुप पाहायला मिळत आहे. कुठे उकाडा वाढत आहे, तर कुठे पावसाळी ढग चिंतेत भर टाकताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 29, 2024, 07:34 AM IST
Maharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूल  title=
Maharashtra Weather news rain predictions in vidarbha coldwave latest update

Maharashtra Weather News : मान्सूननं माघार घेतली असली तरीही पावसाचं सावट काही महाराष्ट्राची पाठ सोडताना दिसत नाहीय. कारण, ठरतंय ते म्हणजे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात सातत्यानं बदलणारी हवामानाची स्थिती. पावसानं माघार घेतल्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये उकाडा वाढला. कमाल आणि किमान तापमानात झपाट्यानं वाढ झाल्यामुळं काही ठिकाणी पुन्हा एकदा बाष्पीभवनाची प्रक्रिया होऊन, पावसाच्या ढची निर्मिती होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

एकिकडे वरील भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी असतानाच, दुसरीकडे राज्याच्या उर्वरित भागांमध्ये सोमवारप्रमाणं, मंगळवारीसुद्धा हवामानात फारसे बदल जाणवणार नाहीत. दिवाळीच्या दिवसांसाठी हे काहीसं अनपेक्षित वातावरण ठरत आहे. साधारण हिवाळ्याची चाहूल लागणाऱ्या या दिवसांमध्ये सध्या मात्र पावसाचं आणि धुरक्याचच वातावरण असल्यामुळं दिवाळी पावसाळी होणार का, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. 

हेसुद्धा वाचा : ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुजय विखे-पाटलांची दुर्योधनाशी तुलना! म्हणाले, 'जयश्री थोरातांबाबत वापरलेली भाषा फडणवीसांना...'

 

पुढील 24 तासांमध्ये राज्यातील कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. किनारपट्टी भागांमध्ये मात्र हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अधिक राहणार असल्यामुळं उष्णतेचा दाह अधिक जाणवणार आहे. राज्यात सध्या सोलापूर आणि नजीकच्या भागांमध्ये तापमानाचा आकडा 35 अंशांच्या पलिकडे असून, हे उच्चांकी तापमान ठरत आहे. तर, पाचगणी, महाबळेश्वर भागात तापमान 16 ते 18 अंशांदरम्यान असल्याचं पाहायला मिळत आहे.