Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची चाहूल लागली असून, साताऱ्यासह कोकणातही पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी अनुभवता येत आहे. पण, काही भागांमध्ये मात्र पावसाची हजेरीसुद्धा पाहायला मिळत आहे. ज्यामुळं राज्यातील हवामानाचं चित्र सातत्यानं बदलता दिसत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये देशाच्या काही राज्यांसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल.
पुढील 24 तासांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसू शकतात. यामध्ये रस्तागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार आहे. मुंबईसह पुण्यातही पावसाच्या तुरळक सरी बरसणार आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यासह पश्चिमी झंझावात सक्रीय असल्यामुळं देशात सध्या पावसाळी वातावरण निर्मितीस पूरक परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर, उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढताना गिसणार आहे. पर्वतीय क्षेत्रांमध्ये तापमानाचा पारा बराच खाली आल्यामुळं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये बर्फवृष्टीही होत आहे. ज्यामुळं मैदानी क्षेत्रांमध्येही कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. ज्यामुळं या राज्यांमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांमध्ये सध्या आनंदाटचं वातावरण पाहायला मिळत आहे.
बर्फवृष्टीमुळं गुलमर्ग आणि नजीकच्या भागांमधील वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्हीही उत्तर भारतात हिवाळी सहलीसाठी येणार असाल तर एकंदर हवामान पाहता फक्त हिवाळाच नव्हे, तर पावसाळ्याच्या तयारीनिशीसुद्धा या.