मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसंच तीन जिल्ह्यात जाळपोळ झाली असून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जर कोणी कोणाची आई-बहिण काढत असेल तर विरोधी पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा सदस्य असो, हा देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी उभा राहिल असं म्हटलं आहे. यानंतर मनोज जरांगे यांनीही त्यांना उत्तर दिलं आहे.
"कुठल्या स्तराला आपले राजकारण सुरु आहे. समाजाचे तुकडे करणारे राजकारण नको
कोणासोबत त्यांचे फोटो बाहेर येत आहेत, एक एक गोष्ट बाहेर येत आहे. कोणी कोणाची आई-बहिण काढत असेल तर विरोधी पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा सदस्य असो, हा देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी उभा राहिल. जरांगे पाटील यांच्याबाबत मला काही बोलायचं नाही. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे माहिती आहे. वॉर रूम कोणी उघडली याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे वॉर रूम कुणी सुरु केली, याबाबत सखोल चौकशी करून षडयंत्र शोधून काढू," असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले आहेत.
यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, "आमच्या आया-बहिणीच्या छाताडवर नाचलात, गोळ्या घातल्या तेव्हा वाईट वाटलं नाही का? आणि आज वाईट वाटत आहे. आमच्या आई-बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिला आणि वरुन हाणलं. 20 पोलीस एका महिलेला मारहाण करत होते. उचलून आपटता का, विटा डोक्यात हाणता त्याच्या. तुमची आई म्हटलं तर किती लागलं. आमच्या आया-बहिणी उभ्या चिरल्यात तेव्हा कुठे गेला होता एसआटी नेमणारा?".
"सत्ता हातात आली म्हणून त्याचा दुरुपयोग करु नका. मी पळून जाणाऱ्यातला नाही. मराठ्यांच्या आय़ा-बहिणीवर हात उचलून देणार नाही. मला हवं तर जेलमध्ये टाका, मी 50 वर्षं शिक्षा भोगायला तयार आहे. आमच्या आया-बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. चारही बाजूला टाके आहेत, पाय मोडले आहेत. तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का? आई-बहिणी सगळ्यांच्या आहेत, त्यांचं रक्षण करा. जर कोणी विरोधात बोलत असेल तर माफ करु नका. याच्या हातात सत्ता आहे म्हणून एसआयटी नेमण्यास लगेच परवानगी दिली. मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे," असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
"काही आमदार बाकडे वाजवत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या जातीच्या पाठीशी उभे राहा. मी मरायला तयार आहे. फासावर जाण्यासही तयार आहे. पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही. फक्त मराठ्यांनी अर्ध्यातून मागे हटू नका. माझ्या पाठीशी उभे राहा," असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.