Maratha Rseravtion : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगेंच्या बाजूने असणाऱ्या लोकांनी आता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कीर्तनकार अजय बारसकर यांनी पत्रकार परिषदा घेऊन मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांत बंद दाराआड बैठका घेतल्या आहेत, असा गंभीर आरोप केला. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचा वारंवार उल्लेख करत मनोज जरांगेंनी त्यांना इशारा दिला आहे.
बारसकर यांच्या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. देवेंद्र फडणवीस माझं एन्काऊंटर करण्याचा विचार करत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यातील कार्यक्रमानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मला संपवण्याचा कट रचण्यात येत असल्याचंही जरांगे यांनी म्हटलं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'जरांगे काय म्हणाले ते मी ऐकलं नाही', अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस निघून गेले.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये. 10 टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरु द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीस यांचं स्वप्न आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
"माझ्याविरुद्ध महिलेची एक जरी तक्रार सापडली तर तुम्ही म्हणेन ते ऐकेन. गेल्या 30 वर्षात कुठेही माझ्याविरुद्ध महिलेची एक तक्रार असेल तरी मी तुम्ही सांगाल ते ऐकेल. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात लक्ष नाही घालू नाही शकत. माणसं पाठवून मला बदनाम केलं जात आहे. देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे जातीजातीत भांडणं लावणं आणि जातीजातीच्या नेत्यांना संपवणे असंच आहे. बहुजन, मराठा आणि ओबीसी संपला पाहिजे, हा त्यांचा डाव आहे," असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगेंचा सांगर बंगल्यावर जाण्याचा इशारा
"तुला माझा बळी घ्यायचा ना... तुला माझा बळी पाहिजे ना, मी सागर बंगल्यावर येतो घे माझा बळी. मी इथे उपोषण करून मरण्यापेक्षा मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो. मी मध्ये अन्नही घेणार नाही, मी मध्ये जर मेलो, तर मला मेलेला म्हणून मला माघारी आणा, नाहीतर सगेसोयऱ्यांचा गुलाल घेऊन येतो," असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषणाचा स्टेज सोडला आणि मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला.