विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणूकांसमोर पुन्हा एकदा एमएमआय विरुद्ध शिवसेना- भाजप असा वाद रंगण्याची चिन्हं आहेत आणि याला कारण ठरतयं ते बाळासाहेब ठाकरे आणि गोपिनाथ मुंडे यांच प्रस्तावित स्मारक. या दोन्ही स्मारकांना एमआयएमनं विरोध दर्शवला आहे, त्यामुळं शिवसेना आणि भाजपही आक्रमक झाले आहेत.
औरंगाबादेत बाळासाहेब ठाकरे आणि गोपिनाथ मुंडे यांच स्मारक प्रस्तावित आहे, ही दोन्ही स्मारकं बांधायची तयारी सुरु आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे, मात्र याच स्मारकांना एम आयएमनं विरोध सुरु केला आहे. सरकारी पैशांतून स्मारक कशासाठी असा सवाल एम आय एम नेते आणि खासदार इम्तिजाय जलील यांनी केला आहे. स्मारक बांधायची असतील तर या नेत्यांनी ज्यांना मोठं केलं त्यांनी त्यांच्या पैशातून बांधावे सरकारी खर्चातून होवू देणार नाही अशी भूमिका जलील यांनी घेतली आहे, इतकंच नाही तर या स्मारकाविरोधात कोर्टात जाणार असल्याच सांगत याचं कंत्राटही कुणी घेवू नये अशे आवाहन जलील यांनी केलं आहे.
एमआयएमच्या या विधानानं शिवसेना भाजप मात्र चांगलेच भडकले आहे, एम आयएम निवडूण आल्यानं शहरात पुन्हा दंगली सुरु झाल्यात, मोठं स्मारक होतंय आणि त्यामुळं यांच्या पोटात दुखत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय, तर एम आय एमचा विरोध सहन करणार नाही असा पवित्रा भाजपनं घेतला आहे,
निवडणूकांच्या तोंडासमोर एम आयएमनं पुन्हा जुन्याच वादाला फोडणी दिली आहे. त्यातून औरंगाबादचं राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे, त्यात एम आयएम मुस्लिम मतांना एकत्रित कऱण्यासाठी एकाच वेळी शिवसेना भाजपला टार्गेट करीत असल्याची चर्चा आहे, त्यामुळं निवडणूकांत रंगत येतांनाच संभाजी नगरचा मुद्दा असो वा स्मारकांचा यातून वाद पेटणार हे नक्की..