मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेत कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सूकता सर्वांनाच लागली आहे. भर पावसातही मतदार घराबाहेर पडले व त्यांनी मतदान केले.
याठिकाणी शिवसेना आणि भाजपामध्ये या ठिकाणी कांटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. १० वाजल्यापासून याच्या मतदान मोजणीला सुरूवात होणार असून १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेऊन केलेला प्रचार पाहता दोन्ही पक्षांसाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याचा प्रत्यय प्रचारादरम्यान आलाच आहे.
भाजपने एकूण ९० जागांवर तर शिवसेनेने ९३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेसनेही ७५ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.
भाजपाला एकहाती सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे तर भाजपाचे मेरू रोखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. त्यामुळे यांच्यामध्ये कोण बाजी मारतो हे थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे.
मिरा-भाईंदरमधील एकूण २४ प्रभागांपैकी ९५ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र, यापैकी एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने रविवारी ९४ जागांसाठी मतदान झाले.
यावेळच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढेल अशी आशा होती. पण काल सकाळपासून पडत असलेल्या पावसामूळे सर्व आशेवर पाणी पसरले. ९, २२ आणि १८ प्रभागांत कमी मतदान झाल्याने मतदानाची सरासरी घसरली.
काल मतदानाचा आकडा ४६.९३ टक्क्यांपर्यंतच पोहचू शकला. पाऊस नसता तर या वेळी मतदान पन्नास टक्क्यांच्या वर गेले असते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सकाळच्या वेळेत मतदारांनी बाहेर न पडण्याचे पसंत केल्याचे चित्र दिसून आले. सर्वाधिक मतदान उत्तन प्रभागात ६३ टक्के इतके झाले, तर सर्वात कमी मतदान मिरा रोडच्या नयानगर येथील प्रभाग २२ मध्ये सुमारे ३५.३८ टक्के इतके झाले.
मुर्धा, राई या प्रभागांतही ६० टक्के इतके मतदान झाले. उर्वरित सर्व मतदान केंद्रांवर सुमारे ५० टक्के मतदान झाले.