भाजपच्या नेत्यांना खासगीत विचारा ते हेच सांगतील - रोहित पवार

महाविकास आघाडीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं आहेत

Updated: Jul 7, 2020, 10:43 AM IST
भाजपच्या नेत्यांना खासगीत विचारा ते हेच सांगतील - रोहित पवार  title=

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते हे स्वतःला हुशार समजत असतील तर आमच्या महाविकास आघाडीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं आहेत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. एवढ्यावरच रोहित पवार थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जातो. भाजप सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी आणि हुकूमशाही होती. 

भारतीय जनता पार्टी हे ऑक्टोबर पर्यंत सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली होती. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत रोहित पवार यांनी संजय राऊत यांच समर्थन करत भाजपालाच इशारा दिला आहे.

पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अलीकडेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळं आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये वर्चस्वाचं राजकारण सुरू झाल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचंही बोललं जात होतं. विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासूनच असे आरोप होते. त्यात या घटनेनं भर पडली आहे. यावर पारनेर येथे प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी हे उत्तर दिलं आहे. 

 भाजपच्या आमदारांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधीला मदत न करता पंतप्रधान निधीला पैसा (पीएम केअर्स) दिला. त्यातून केंद्र सरकारने खरेदी केलेले व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रात पाठवले आहेत. परंतु ते खराब आहेत.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल केंद्र सरकारला विचारणा करावी, असाही टोला रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे.