Monsoon Alert : पुढचे 5 दिवस 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाने रात्रीपासून जोरदार हजेरी लावली होती. 

Updated: Jun 11, 2022, 07:47 AM IST
Monsoon Alert : पुढचे 5 दिवस 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा   title=

मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाने रात्रीपासून जोरदार हजेरी लावली होती. आज सकाळी रिमझिम पाऊस सुरू आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे. 

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 

अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. गोव्याच्या सीमेवर रेंगाळलेला मान्सून सिंधुदुर्गात दाखल झाला. जिल्ह्यात कालपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत.मान्सून सिंधुदुर्गात दाखल झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं. आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. 

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पुढचे 4 दिवस देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

नगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारदरा, बुलढाणा, चंद्रपूर आणि विदर्भातही 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.