मुंबई : राज्यभरात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने शेतकरी सुखावले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात अद्यापही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
नाशिक शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. गोदा काठालगतच्या गटारीतील पाणी भरून वाहू लागल्याने सराफ बाजारासह दहिपुल परिसर पुन्हा जलमय झाला.
त्यामुळे गोदाकाठ लगतच्या स्मार्ट कामांचे पितळ पुन्हा उघडे पडले. पंचवटीतील बुधवारच्या बाजारातील विक्रेत्यांचे नुकसान झाले. जुन्या नाशकात भिंत कोसळली.
कल्याणमध्ये पावसाचं धुमशान सुरू झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिमेकडील शहाड पुलाखाली गुडघाभर पाणी साचलंय. टिटवाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक मुरमाड रोडमार्गे वळवण्यात आलीये.
तर शहाड पुलावरही प्रचंड वाहतूक कोंडी झालीये. पुलाच्या बाजुला असलेल्या न्यू अंबिकानगर सोसायटीतही पाणी साचलं असून त्यामुळे नागरीक जीव मुठीत धरून आहेत.