जळगाव : कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. रुग्णांची परिस्थिती सुधारत असली तरी रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यात भर पडताना दिसत आहे. दरम्यान जळगावमध्ये दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक 33 वर्षीय तरूण आणि 65 वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचे रिपोर्ट येण्याआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे.
जळगाव | २ कोरोना संशयितांचा मृत्यू
३३ वर्षीय तरूणाचा मृत्यू
६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू होते https://t.co/HOK58cBO5u— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 5, 2020
दरम्यान, कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती म्हणजेच जास्तजण संपर्कात येऊ शकतील अशा ठिकाणी ड्रोन तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करावा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईतही कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 52 रुग्ण वाढले आहेत. तर मुंबईत कोरोनो रुग्णांची संख्या 330 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या आकडा 537वर पोहचला आहे.