नागपुरात वाऱ्यासह पाऊस, उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा

नागपूर शहरात सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाच्या सरींचा शिडकावा झाला.  

Updated: Jun 1, 2019, 09:21 PM IST
नागपुरात वाऱ्यासह पाऊस, उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा title=

नागपूर : शनिवारी संध्याकाळी नागपूर आणि लगतच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मे महिन्यातील या अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसला. ऐन वेळी पावसाच्या हजेरीने पादचारी तसेच दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली होती. गेल्या अडीच महिन्यांपासून होरपळून काढणाऱ्या उन्हापासून नागपूरकरांना आज दिलासा मिळाला. दुपारी चारनंतर वातावरण बदलले. शहरात सोसाट्याचा वारा सुटला होता. काही ठिकाणी  पावसाच्या सरींचा शिडकावा झाला.

सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णतेने अंगाची काहीली होत आहे. मात्र, आज दुपारी अचानक पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात थोडासा गारवा आला. त्यामुळे नागपूरच्या तापमानात थोडी घट झाली. नागपुरात पावसाच्या सरी कोसळत असताना वाऱ्याचा वेग जास्त होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसला सुरुवात झाल्याने शहरात अनेकांची तारांबळ झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, सोसाट्याच्या  वाऱ्यामुळे शहरात दुचाकी चालवणे अवघड झाले होते. प्रचंड वाऱ्यामुळे गडकरी यांच्या सत्कार कार्यक्रमस्थानी भट्ट सभागृहाबाहेर होर्डिंगही पडले होते.

नागपुरात गेल्या २४ तासात तापमानात दीड अंश सेल्सिअसने वाढ होऊन पारा शुक्रवारी ४६.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. शनिवारी अचानक पडलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली. तापमान तब्बल २.७ अंश सेल्सिअसने कमी होत पारा ४३.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला.