पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात नवा गौप्यस्फोट झालाय. दाभोलकरांच्या हत्येमध्ये चौघांचा समावेश असण्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केलीय. शरद कळसकर आणि सचिन अंदुरेसह अन्य दोन जणांचा दाभोलकरांच्या हत्येत समावेश असल्याची माहिती सीबीआयने न्यायालयात दिलीय. दरम्यान, शिवाजीनगर न्यायालयाने कळसकरला १७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावलीय.
पुण्यातील ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर झाली त्या पुलावर नरेंद्र दाभोलकर यांना ओळखणारे दोघे जण आधीच पोहचले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे पुलावर पोहचले. जेव्हा दाभोलकर पुलावर आले तेव्हा कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी हेच दाभोलकर आहेत का याबाबत तिथे उपस्थित असलेल्या दोघांकडून खात्री केली. ती होताच दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्याचं सीबीआयने न्यायालयात सांगितलं.
तसंच या हत्याप्रकरणात कळसकरसह वैभव राऊतचाही समावेश होता. राऊतनेच चार पिस्तुलांची विल्वेवाट लावल्याची अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिली. कळसकर-अंदुरेसह अन्य दोघे कोण होते याचा तपास करण्यासाठी सीबीआयने कळसकरची कोठडी वाढवण्याची मागणी केली. शिवाजीनगर न्यायालयाने कळसकरला १७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावलीय.